आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या अनैतिक प्रेमसंबंधांची किंमत तिच्या 15 वर्षांच्या निष्पाप मुलीला चुकवावी लागली. मृत मुलीच्या आईच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या 23 वर्षीय प्रियकराने मुलीला क्रूरपणे संपवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा उलगडा केला तेव्हा सत्य ऐकून अधिकारीही थक्क झाले. राधिका असं या 15 वर्षीय मृत मुलीचं नाव आहे. जंगलात जळालेल्या अवस्थेतील तिचा मृतदेह सापडला होता. पंजाबच्या नवाशहर परिसरातील ही घटना आहे
आईचे गोपीशी अनैतिक संबंध मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय आई उषा राणी हिचे तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या गुरविंदर सिंग उर्फ गोपी (23) याच्याशी अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधांमध्ये तिची 15 वर्षांची मुलगी अडथळा ठरत होती. याच रागातून आरोपी गुरविंदरने मुलीला घरात एकटे पाहिले आणि अत्यंत निर्घृणपणे तिचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि जंगलात नेऊन जाळला
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी गुरविंदर याला तातडीने अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या धक्कादायक कटात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची कसून चौकशी या पोलीस कोठडीदरम्यान केली जात आहे.
