मुंबई स्वप्नांचं शहर.. मायनागरी… याच मायानगरीतील अँटॉप हिल परिसरात एक अतिशय धक्कादायक, हादरवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. तिथे मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (एमडीएस) ची विद्यार्थिनी स्तुती सोनवणे ( वय 24) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्तुती तिच्या आईवडिलांसोबत आणि बहिणीसोबत राहत होती.आत्महत्येनंतर पोलिसांना तिच्या खोलीत सहा पानांची मोठी सुसाईड नोट सापडल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. टॉक्सिक रिलेशनशिप आणि मानसिक छळाची भयानक कहाणी त्यातून उघड झाली आहे.

सकाळी 11 पर्यंत स्तुति तिच्या खोलीतून बाहेर आली नाही, घरच्यांनी तिला खूप हाका मारल्या, दारही बराच वेळ वाजवलं. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. काही अघटित तर घडलं नाही ना, या भीतीने घरच्यांनी तिच्या रूमचा दरवाजा तोडला, मात्र समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. स्तुतीने गळफास लावून घेतला होता, तिचा मृतदेह समोर लोंबकळत होता. घरच्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.

मृत्यूपूर्वी लिहीलेल्या नोटमध्ये स्तुतीने बॉयफ्रेंडसोबत तिच्या बिघडलेल्या नात्याचा उल्लेख केला. तिचा पार्टनर सतत तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि तिचा मानसिक छळ करायचा असं तिने त्यात लिहीलं होतं.

मात्र सगळ्यात धक्कादायक खुलासा तर पुढे होता. स्तुतीचे मित्र तिला मजेमजेत वॉर्निंग द्यायचे, बाई गं सांभाळून रहा, नाहीतर कदाचित तुझे तुकडेही फ्रीजमध्ये सापडतील, असं तिने नोटमध्ये लिहीलं होतं. हा संदर्भ थेट दिल्लीतील कुख्यात श्रद्धा वालकर हत्याकांडाशी निगडीत होता. तिच्या मित्र-मैत्रीणींनी व्यक्त केलेली ही भीती फक्त मजेत नव्हती, तर त्यातून स्तुतीच्या नात्यातील कटुता आणि हिंसाचाराची शक्यता दर्शवत होती. प्रियकराच्या गैरवर्तनामुळे आणि वारंवार फसवणूकीच्या आरोपांमुळे ती खचून गेली होती असंही स्तुतीने तिच्या चिठ्ठीत लिहिलं होतं.याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. ते आता स्तुतीच्या प्रियकराचा जबाब नोंदवून घेत असून आणि त्याच्या फोन कॉल रेकॉर्डचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. हे आत्महत्येला प्रवृत्त करण्याचे प्रकरण आहे का याचाही तपास करण्यात येत आहेत. तरुणांमधील वाढता मानसिक ताण आणि नातेसंबंधांमधील वाढता हिंसाचारावर या घटनेने प्रकाश टाकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!