गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकर प्रचंड त्रस्त झाले होते. याच पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित दुमजली उड्डाणपुलाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या पुलाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नाव देण्यास संमती दर्शवली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित दुमजली उड्डाणपुलाचे नुकतंच उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांना एक मागणी केली. या उड्डाणपुलाची संकल्पना आणि त्याचा पाठपुरावा अजित दादांनी अतिशय आक्रमकपणे केला होता. विद्यापीठ चौकातील हा पूल त्यांच्याच दूरदृष्टीतून आकाराला आला आहे. त्यामुळे या पुलाला अजित पवारांचे नाव देण्यात यावे ही सर्वांची इच्छा आहे, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले होते.
