काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. ही म्हण गुजरातच्या वलसाडमधल्या एका रहिवाशासाठी तंतोतंत लागू होते. या म्हणीला शोभावी अशीच एक घटना त्यांच्यासोबत घडली आहे. गुजरातच्या वलसाडमधील अंगावर अक्षरश: काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. सरदार हाइट्सच्या (गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुल) साबरमती इमारतीत सकाळी सकाळी लिफ्टचा मोठा अपघात झाला. या अपघाताचा अत्यंत भीतीदायक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही त्यावर भीती व्यक्त केली आहे. या फुटेजमध्ये स्पष्ट पहायला मिळतंय की एक व्यक्त लिफ्टमधून बाहेर पडताच लिफ्ट अचानक वेगाने वरच्या दिशेने जाऊ लागते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख वत्सलभाई पांचाळ अशी पटली आहे. ते सरदार हाइट्समधील इमारतीतील रहिवासी आहेत.व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट पहायला मिळतंय की वत्सलभाई पांचाळ हे लिफ्टमधून बाहेर पडतात. ते एक पाऊल बाहेर टाकताच अचानक लिफ्ट वरच्या दिशेने वेगाने जाते. त्यात ते बाहेर फेकले जातात आणि जमिनीवर पडतात. हा व्हिडीओ पाहून स्पष्ट जाणवतं की अवघ्या काही सेकंदांमुळे त्यांचे प्राण वाचले. अन्यथा ते लिफ्ट आणि भिंतीच्या मधे अडकून पडले असते. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत वत्सलभाई हे किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु हे सर्वकाही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर त्यांचे प्राण सुरक्षित आहेत. परंतु या अपघातानंतर उंच इमारतींमधील लिफ्टच्या सुरक्षिततेबद्दल आणि देखभालीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहायला मिळतंय की सकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी एक व्यक्ती लिफ्टमध्ये प्रवेश करते आणि नंतर लिफ्टचं बटण दाबते. त्यानंतर लिफ्टच्या दाराजवळ उभी राहून ती व्यक्ती वाट बघत असते. 7 वाजून 23 मिनिटांनी जेव्हा ती लिफ्ट थांबते आणि दरवाचा उघडतो, तेव्हा ती व्यक्ती बाहेर पडण्यासाठी एक पाय पुढे टाकते, तितक्यात लिफ्ट खूप वेगाने वरच्या दिशेने जाऊ लागते. त्या व्यक्तीचं डोकं वरच्या मजल्यावर आदळतं, ज्यामुळे तो जमिनीवर पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!