देशभरात डीजिटल अरेस्टचे प्रकार वाढत आहेत. पोलीस अधिकारी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून ज्येष्ठांना लुटलं जात आहे. आता या डीजिटल अरेस्टवाल्यांनी तर हद्दच गाठली आहे. मुंबईत एका 68 वर्षीय महिलेला मी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड बोलतोय असं सांगून 3.71 कोटींना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असून आम्ही केंद्रीय एजन्सीचे कर्मचारी असल्याचंही या ठकसेनांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची ऑनलाईन कोर्ट सुनावणीही केली. यावेळी एका आरोपीने मी स्वत:ची ओळख माजी सरन्यायाधीश चंद्रचूड अशी करून दिली होती.
या प्रकरणाची सायबर क्राईम ब्रँचने गंभीर दखल घेतली आहे. सुरतवरून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या खात्यात 1.71 कोटी रुपये ट्रान्स्फर झाले होते. एका बोगस कपड्याच्या कंपनीच्या नावाने त्याने अकाऊंट उघडलं होतं. त्याबदल्यात त्याला 6.40 लाखांचं कमिशन मिळालं होतं.
