देशभरात सायबर फ्रॉडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे फसवणुकीची पद्धतही दिवसेंदिवस बदलत आहे. दरम्यान, पुण्यातील सायबर क्राईमचे असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपीची पत्नी एका राजकीय पक्षाशी निगडीत आहे. या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात एकूण 6 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री असे या सायबर भामट्याचे नाव आहे. तो मूळचा रायगडचा आहे. त्याने मनी लाँड्रिग व्यवहारात डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची 6 कोटी 29 लाखांची फसवणूक केली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर सायबर चोरट्याला पोलिसांनी पनवेल परिसरातून अटक केली होती. त्याला सध्या पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. त्याने आतापर्यंत एकूण पाच जणांची फसवणूक केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याची पत्नी राष्ट्रवादीची कार्यकता असून ती गावाची सरपंचदेखील आहे.
